न्या. महादेव गोविंद रानडे

सर्वज्ञ: सहि माधव: असा गौरवपूर्ण उल्लेख लोकमान्य टिळकांनी केसरींच्या मृत्युलेखात यांचा केला त्या न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म आमच्या निफाड शहरात झाला याचा रास्त अभिमान आम्हा निफाडकरांना आहे. गेल्या शतकात भारतीय राजकारण व समाजकारण या क्षेत्रात उत्तुंग कार्य करणार्‍या थोर भारतीय नेत्यामध्ये महाराष्ट्र भूषण न्या. महादेव गोविंद रानडे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. भारतपिता महात्मा गांधी यांचे गुरु नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे गुरु म्हणून न्या. रानडे यांना ओळखले जाते. सन १८८५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय कॉग्रसेच्या संस्थापकांपैकी एक म्हणून न्या. रानडे यांचेकडे बोट दाखवावे लागेल.

दि. १८ जानेवारी १८४२ रोजी जन्मलेल्या न्या. महादेव गोविंद रानडे यांचे प्राथमिक व इंग्रजी शिक्षण कोल्हापूर येथे झाले. एल्फिनस्टन कॉलेज मधुन त्यांनी १८६२ मध्ये बी.ए. व १८६५ मध्ये एम.ए. नंतर एल.एल.बी. केले. या सर्व परिक्षांत ते प्रथम क्षेणीत उत्तीर्ण झाले. यावरुन त्यांच्या बुध्दिची व हुशारीची चमक दिसून येते. एकमार्गी बुध्दिमान, व्यासंगी व वाचनाची अफाट गोडी असणार्‍या महादेवरावांच्या गुणांचे कौतुक त्यांच्या इंग्रज विद्वतज्ञांनी केलेले आहे.

लोकमान्य टिळक म्हणतात महाराष्ट्र देश हा त्यावेळी थंडगार गोळा होऊन पडला होता. त्यात उब आणून जीवंतपणा आणण्याचे काम माधवरावांनी केले. हीच त्यांची थोरवी आहे. न्या. रानडे यांनी अनेक ग्रंथ लिहिले त्यात सन १९०० मध्ये प्रसिध्द झालेला ‘मराठी सत्तेचा उदय’ याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. न्या रानडे यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक मानले जाते.

महाराष्ट्रात न्या. रानडे यांनी अनेक संस्था स्थापून सामाजिक चळवळीची पायाभरणी केली. सन १८६६ मध्ये प्रार्थना समाज १८६७ मध्ये वत्कृत्योजक सभा, सन १८७० मध्ये सार्वजनिक सभा, १८७५ मध्ये वेदशास्त्रोत्तजक सभा, १८८७ मध्ये सामाजिक परिषद १८९६ मध्ये डेक्कन सभा, टाऊन हॉल, पुण्याची नेटीव्ह लायब्ररी, औद्योगिक परिषद व प्रदर्शन, फर्ग्युसन कॉलेज, फिमेल हायस्कूल, लवाद कोर्ट, रेशमाची गिरणी, तांब्या-पितळाची गिरणी, पुना मर्कण्टाईल बँक, मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष इत्यादी संस्था व उपक्रम चालु करण्यामागे स्वत: न्या. रानडे प्रेरणास्त्रोत होते.

न्या. महादेव गोविंद रानडे राष्ट्रीय स्मारक

अशा युगपुरूषाच्या जन्मस्थळी उचित राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी इच्छा समस्त निफाडवासीयांची आहे. या इच्छेला मूर्त स्वरुप देण्यासाठी श्री माणकेश्वर वाचनालय, या सार्वजनिक विश्वस्त संस्थेने ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आहे. श्री माणकेश्वर वाचनालय, निफाड ही सार्वजनिक विश्वस्थ संस्था असून ती दि. ९ जुलै १९१९ साली स्थापन झाली. ही संस्था आता शतकाकडे वाटचाल करीत आहे. महाराष्ट्र शासनमान्य तालुका ‘अ’ वर्ग प्राप्त झालेल्या या वाचनालयाने निफाड तालुक्यातील ग्रंथालय चळवळीला सक्रीय नेतृत्व दिलेले आहे. ग्रामीण भागातील ‘क’ व ‘ड’ वर्ग वाचनालयांना ‘राजा राममोहन रॉय’ साखळी योजने मार्फत ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येतात. भारत सरकार पुरस्कृत कोलकत्ता येथील राजा राममोहन रॉय फौडेशनचा सन २००५ मधील सर्वोत्कृष्ट ग्रामीण ग्रंथालयाचा पुरस्कार श्री. माणकेश्वर वाचनालयास प्राप्त झालेला आहे. विविध विषयावर सुमारे २८००० वर ग्रंथानी वाचनालय समृध्द झाले आहे. निफाडच्या सांस्कृतिक जडणघडणीत विविध उपक्रमाद्वारे सामाजिक प्रबोधनाचे कार्य हे या संस्थेचे वैशिष्ट आहे. यात पुणे विद्यापिठाच्या बहि:शाल मंडळाची व्याख्यानमाला व शिबीर न्या. रानडे जिल्हास्तरीय वत्त्कृत्व स्पर्धा, कार्यशाळा या उपक्रमांचा उल्लेख करावा लागेल. विद्यमान संचालक मंडळाने न्या. रानडे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा प्रकल्प साकारण्याचा दृढ निश्चय करून कामास सुरुवात केलेली आहे. त्यानुसार योजना आखण्यात आली आहे. सर्वप्रथम त्या योजनेनुसार माणकेश्वर वाचनालयाने न्या. रानडे यांचा जन्म ज्या जागेत झाला ती सुमारे ३२५ चौ. मि. जागा मूळ मालकाकडून खरेदी केलेली आहे.

मागे नमुद केल्या प्रमाणे न्या.रानडे यांच्या जन्मस्थळी तीन मजली भव्य वास्तु उभारून त्यात न्या. रानडे यांचा पुतळा व त्यांच्या जीवनातील प्रसंग चित्ररुपाने साकारले जाणार आहेत. न्या. रानडे यांच्या उपलब्ध समग्र लेखनाचे ज्यात त्यांची पत्रे, लेख, भाषणे इत्यादी असे सर्व विचारधन संकलीत करून ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे न्या रानडे यांच्या संदर्भात ज्या विचारवंतानी लेखन केले आहे त्यांची साहित्यसंपदा मिळविण्याचा प्रयत्न करणार आहोत. न्या. रानडे यांचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी दरवर्षी एक व्याख्यानमाला चालविण्यात येणार आहे. याशिवाय या स्मारकाबाबत महाराष्ट्रातील विचारवंताच्या सूचनांचा पण समावेश हे स्मारक साकारतांना करण्यात येईल. या वास्तुत तळमजल्यावर स्मारक व वाचनकक्ष, १ ल्या मजल्यावर ग्रंथालय व अभ्यासिका आणि २र्‍या मजल्यावर सभागृह अशी योजना आहे. या सर्व प्रकल्पाचा खर्च अंदाजे १ ते १ .२५ कोटी पर्यत येणार आहे.

हा एवढा मोठा प्रकल्पनिधी उभारण्यासाठी महाराष्ट्रातील सार्वजनिक सहकारी संस्था, शासन व आमजनतेने यथाशक्ती आर्थिक मदतीचा हात द्यावा अशी कळकळीची नम्र विनंती आम्ही करीत आहोत. या संदर्भात आपणास अधिक माहिती पाहिजे असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधावा. निधी संकलनाचा शुभारंभ मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब (सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री म.रा.) यांनी रु. २ लाख व मा. ना. श्री. राजाराम पानगव्हाणे यांनी रु. १ लाख वैयक्तिक निधी देऊन केला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत नियोजित वास्तुचे भूमिपूजन दि. १५ ऑगस्ट २०१० रोजी मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या शुभहस्ते होऊन सदरील बांधकाम प्रगतीपथावर आहे. न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या राष्ट्रीय स्मारकास आपण सर्व मदत कराल अशी आमची अपेक्षा आहे. पुनश्च: आर्थिक मदतीचे कळकळीचे आवाहन. धन्यवाद.
आपले विनित अध्यक्ष व संचालक मंडळ.